‘मालक मालकच राहिले, मात्र जनतेला…’, शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांचा कोणावर निशाणा?
शरद पवार गट राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवारी जाहीर होताच महेश कोठे यांनी भाजपच्या विजयकुमार देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बघा नेमकं काय म्हणाले?
सोलापूर शहर उत्तर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महेश कोठे यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महेश कोठे यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळताच कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होताच महेश कोठे यांनी भाजपच्या विजयकुमार देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. ‘शरद पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे. अडीच वर्षांपूर्वी शरद पवारांनी मला शहर उत्तरच्या उमेदवारीबाबत शब्द दिला होता तो त्यांनी पाळला’, असे महेश कोठे यांनी म्हटलं. तर मागील वीस वर्षापासून विजयकुमार देशमुख यांना मोठी पद मिळाली मात्र त्याचा उपयोग त्यांनी सोलापूरसाठी केला नाही. विजयकुमार देशमुख हे पाच खात्याचे मंत्री राहिले मात्र त्याचा सोलापूरला उपयोग केला नाही. मालक मालकच राहिले मात्र जनतेला मालक केले नाही. सोलापूरला मालकाची नव्हे तर चालकाची गरज आहे, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांनी निशाणा साधला.