राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजितदादा गटाच्या संपर्कात, म्हणाले ‘हो बरोबर आहे कारण…’
माढा लोकसभा शरद पवार साहेब लढणार की नाही याबाबत चर्चा झालेली नाही. मविआचा लोकसभा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. उद्धव ठाकरे आणि आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दसरा झाल्यानंतर तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक घेऊ आणि फॉर्म्युला ठरवू, असे जयंत पाटील म्हणाले.
मुंबई | 19 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे अजितदादा गटाच्या संपर्कात आहेत. जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिलाय. अजितदादा गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण, त्यांच्याकडील लोक जर म्हणत असतील की मी त्यांच्या संपर्कात आहे. तर ते बरोबर आहे. ते सर्वच माझ्या संपर्कात आहेत, असा टोला त्यांनी लगावला. मराठा आरक्षणाची मागणी योग्य आहे. मराठा आरक्षणबाबत सरकार काय निर्णय घेतंय याची उत्सुकता आम्हालाही आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. टपरीवर सुद्धा ड्रग्ज मिळतंय. ड्रग्जचं प्रमाण खूप वाढलं आहे. हे गृहखाते आणि राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी कोणी शिफारस केली. त्यानंतर तो म्हणाला की पळवून लावलं. हे सगळं समोर आलं आहे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.