दबाब टाकून राष्ट्रवादीला फोडण्याचा डाव; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
राऊत यांच्या मताशी आपण सहमत असून सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकला जात आहे. पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला
बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून जाणीवपूर्वक पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबाबत बदलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना विचारलं असता, राऊत यांच्या मताशी आपण सहमत असून सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकला जात आहे. पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर अजित पवार यांच्यावर अंजली दमानिया यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर अंजली दमानिया यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या याबाबत ट्विट करतात आणि त्याच्या बातम्या बनतात असे ते म्हणाले. अजित दादा हे राजाचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांची जबाबदारी त्यांना पूर्णपणे माहिती आहे. आत्ता ज्या काही घडामोडी टीव्हीवर दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये अजिबात तथ्य नाही. हा दादांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.