'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा नेमकं काय म्हणाले?

‘जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली’, अजितदादा नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Oct 28, 2024 | 2:29 PM

येत्या 20 नोव्होंबरला विधानसभा निवडणूक होणार असून विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून बारामतीत पवार कुटुबांत पुन्हा एकदा तगडी टक्कर होताना दिसणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगला होता. लोकसभेवेळी पवार कुटुंबं आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. त्या निवडणुकीत सुनेत्रा पवार या पराभूत झाल्या होत्या तर सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता. दरम्यान आता विधानसभेला पुन्हा एकदा पवार कुटुंबात लढत होणार आहे. यावेळी पुतण्या विरूद्ध काका असा सामना रंगणार आहे. अशातच लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नीला उभं करून चूक केली असं पुन्हा एकदा अजित पवार म्हणाले आहेत. तर मी केलेली चूक त्यांनी करायला नको होती, पण त्यांनी तीच चूक केली असं अजित पवार म्हणाले. युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीकरता आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. युगेंद्र पवार यांनी अर्ज भरल्यानंतर अजित पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली. आता मतदार काय तो निर्णय घेतील असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार गटावर निशाणा लगावला तर समोरचे उमेदवार काका आहेत, असं मी बघत नाही, मला शरद पवार यांना साथ द्यायची आहे, असं युगेंद्र पवार म्हणालेत.

Published on: Oct 28, 2024 02:29 PM