सांगली हादरली! भररस्त्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
सध्या सांगलीत खळबळ उडाली असून नालसाब मुल्ला असे खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. एकामागून एक आठ गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे. ही घटना शहरातील शंभरफूटी रस्त्यावरील माने चौक परिसरात घडली.
सांगली : सांगली शहरांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सध्या सांगलीत खळबळ उडाली असून नालसाब मुल्ला असे खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. एकामागून एक आठ गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे. ही घटना शहरातील शंभरफूटी रस्त्यावरील माने चौक परिसरात घडली. तर नालसाब मुल्ला हे त्यांच्या घरासमोर थांबलेले असताना बुलेटवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या मुल्लाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर हल्लेखोर हे पसार झालेत. या घटनेची माहिती मिळताच, सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, मात्र नालसाब मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते.