मोफत अन्नछत्र बंद करण्यावरून सुजय विखेंचा भिकाऱ्यांवर नेम, फकीर साईंच्या शिर्डीत विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी?
‘अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय , महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत.. हे योग्य नाही. आम्हाला आंदोलनाची वेळ आली तरी चालेल आम्ही आंदोलन करू’, असं वक्तव्य करत सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानला इशारा दिला आहे.
माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय. महाराष्ट्रातले भिकारी शिर्डीत येतात आणि मोफत जेवण जेवतात, असं वक्तव्य सुजय विखे यांनी केलंय. दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकीय नेते आणि भाविकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. फकीर साईबाबांच्या शिर्डीत आता श्रीमंताच्या प्रतिष्ठे पुढे भिकाऱ्यांची अडचण होऊ लागली आहे. शिर्डीतील अन्नक्षेत्रातील मोफत जेवण बंद करा, कारण पूर्ण महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत, असं विधान सुजय विखे पाटील यांनी केलंय. तीर्थस्थळावर जेवण मोफत द्यावं की नाही हा प्रश्न संस्थानचा आहे. मात्र त्याऐवजी महाराष्ट्रातील भिकारी गोळा झालेत हे कारण देणं वादात आलंय. स्वतः साईबाबा हे शिर्डीत एक फकीर म्हणूनच आलेत. पाच घरातून अन्न-धान्य मागून ते धान्य स्वतः शिजवायचे. स्वतः खायचे आणि उरलेलं गरजूंना वाटायचे, त्याच प्रेरणेतून मोफत अन्नदान येथे सुरू झालं. त्याच हेतूने आजही गावा-गावात गुरूवारी भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. ज्यावेळी मोफत अन्नछत्र शिर्डीत सुरू झालं तेव्हा शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त राधाकृष्ण विखे पाटीलच होते. दीडशे वर्ष पहिले जेव्हा साईबाबा फकीर म्हणून शिर्डीत आले तेव्हा सुजय विखे पाटील असते तेव्हा त्यांनी विरोध केला असता का? असाही सवाल केला जातोय. बघा स्पेशल रिपोर्ट