Nitin Raut | जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु : नितीन राऊत
कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.
मुंबई: राज्यात भारनियमन होण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महत्त्वाची माहिती देऊन राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राज्यात वीज निर्मिती करणारे 27 पैकी 7 संच बंद आहेत. कोळश्याच्या अभावी हे संच बंद करावे लागले आहेत. त्याला कारणीभूत कोल इंडिया असल्याचं सांगत राज्यात कुठेही लोडशेडिंग करण्यात आलेली नाही. नो लोडशेडिंग हा आमचा कार्यक्रम आहे, असं नितीन राऊत यांननी सांगितलं. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विजेची परिस्थिती आणि कोळश्याच्या तुटवड्यावर महत्त्वाची माहिती दिली. कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. राज्यात मागणीच्या तुलनेत 3 हजार मेगावॅट विजेची कमतरता जाणवत आहे. ही विजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.