Ajit Pawar | 12 आमदारांच्या मुद्यावर आज निर्णय नाहीच, राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवारांची माहिती

Ajit Pawar | 12 आमदारांच्या मुद्यावर आज निर्णय नाहीच, राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवारांची माहिती

| Updated on: Sep 01, 2021 | 11:56 PM

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना 12 नावांची यादी दिली होती. मात्र अनेक महिने उलटले तरी यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना 12 नावांची यादी दिली होती. मात्र अनेक महिने उलटले तरी यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. यासह राज्यातील पाऊस आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीत कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली.

अजित पवार म्हणाले की, “मी, मुख्यमंत्री महोदय, बाळासाहेब थोरात, आणि राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांना भेटलो. प्रोटोकॉलनुसार राज्यपालांची भेट घेतली जाते. त्यासाठी आम्ही भेटलो. पावसानं राज्यात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि राज्यातील कोरोनाची स्थिती याबाबत चर्चा केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत प्रश्न केला असता, अजित पवार म्हणाले की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतचा ठराव हा कॅबिनेटने केला होता. परंतु त्यानंतर पुढची कार्यवाही झालेली नाही. म्हणून याबाबत विनंती करण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो. त्याबद्दल लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल, असे सांगून आम्ही राज्यपालांना कार्यवाही करण्याबाबत विनंती केली.

यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, ज्या 12 जणांच्या नावांची यादी राज्यपालांना पाठवली आहे, त्यावर राज्यपालांचा काही आक्षेप आहे का? यावर अजित पवार म्हणाले की, राज्यपालांनी याविषयी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही. या नियुक्तीचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आम्ही केवळ विनंती केली की, हा प्रश्न लवकर सोडवला तर बरं होईल. यावर राज्यपाल म्हणाले की, ठिक आहे, मी सगळं ऐकून घेतलं आहे, त्यामुळे मी यावर योग्य तो निर्णय घेईन.