'एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह', महिला सरपंचाचं होतंय कौतुक; काय आहे अनोखा उपक्रम?

‘एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह’, महिला सरपंचाचं होतंय कौतुक; काय आहे अनोखा उपक्रम?

| Updated on: Aug 28, 2024 | 5:11 PM

पळशी झाशी गावच्या तरुण महिला सरपंच प्रियांका मेटांगे यांचं जिल्हाभरात आता कौतुक होतंय. नागरिकांना ग्रामपंचायतीच्या चांगली सुविधा वेळेत मिळणं अपेक्षित असल्याने गावच्या तरुण महिला सरपंचांनी गावात एक अनोखा उपक्रम सुरू केलाय. बघा नेमका काय आहे उपक्रम?

सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जवळपास प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल फोन आहे. या फोनचा उपयोग कोण कसं करतो? ते आपल्यावर अवलंबून आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पळशी झाशी गावच्या तरुण महिला सरपंच प्रियांका मेटांगे यांनी मोबाईलचा उपयोग गावातील नागरिकांच्या भल्यासाठी तसेच घरपोच सुविधा मिळण्यासाठी केला आहे. यामुळे गावातील नागरिक मात्र आता आनंदी आहे. या महिला सरपंचांनी एक उपक्रम सुरू केलाय,  ‘एक कॉल , प्रॉब्लेम सॉल्व्ह’… आता या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना ग्रामपंचातीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधा वेळेत घरपोच मिळतायत. गावातील एखाद्या नागरिकाला जर जन्म प्रमाणपत्र हवं असेल तर त्याने सरपंचांनी दिलेल्या फोनवर कॉल करून माहिती द्यायची, नंतर काही तासात त्याचं प्रमाणपत्र त्या नागरिकांच्या घरी पोहचविण्यात येईल. तर गावात कुठेही पाणी, गटार,आरोग्य, साफ सफाई यापैकी कुठलीही समस्या असली तर याच फोनवर कॉल करून माहिती दिली तर तात्काळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पाठवून समस्या तात्काळ दूर केली जाणार आहे. त्यामुळं गावातील नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

Published on: Aug 28, 2024 05:11 PM