राज्य सरकारवर कुणाचा थेट निशाणा, ‘…पण लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवणाऱ्यांची महाराष्ट्रात सत्ता’
VIDEO | नांदेडच्या शासकीय रूग्णालयात २४ तासात २४ मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे, 'आधी ठाणे, आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात मृत्यूचा थैमान? '
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | नांदेडच्या शासकीय रूग्णालयात २४ तासात २४ मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे” ही म्हण आपण ऐकली आहे. पण लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवताय हे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी अशी गोष्ट आहे, असे म्हणत त्यांनी निशाणा लगावला आहे. तर आधी ठाणे, आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात मृत्यूचा थैमान… किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. जर सरकारने दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे महायुती सरकार नसून मलिदा खाण्यासाठी शासकीय रुग्णालयांना स्मशानघाटात रूपांतरित करणारे “हत्यारे सरकार” आहे हीच ओळख या सरकारची जनतेत निर्माण होईल, असे म्हणत टीका केली.