गळ्यात संत्र्यांची माळ अन् एकच निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक सरकारवर आक्रमक
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी देखील विरोधकांनी केली. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्यासह काही विरोधी नेत्यांनी हातात निषेधाचे काळे फलक हाती घेत खोके सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी केली
नाशिक, ७ डिसेंबर २०२३ : आजपासून राज्यविधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे. या अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधीमंडळाचा परिसर दणाणून सोडला. नागपूर विधानभवनात दाखल होत विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध व्यक्त केला. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी देखील विरोधकांनी केली. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्यासह काही विरोधी नेत्यांनी हातात निषेधाचे काळे फलक हाती घेत खोके सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांकडून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध नोंदवताना विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधित आक्रमक होत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.