विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा; पंढरपुरात प्रक्षाळपूजा संपन्न
आषाढी एकादशीला वारीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना शेकडो तास अहोरात्र दर्शन दिल्यानंतर थकवा आलेल्या विठ्युरायाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. विठूरायाला गरम पाणी आणि दह्यादूधानं स्नान घालण्यात आले. यावेळी विठुरायाला अकरा देव ब्राह्मणांच्या साक्षीने रुद्राभिषेक करण्यात आला
आषाढी यात्रेमध्ये लाखो भाविकांसाठी कित्येक तास उभे असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा आज शिणवटा काढण्यात आला. अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे. आषाढी यात्रेनंतर शेकडो वर्षांपासून केली जाणारी प्रक्षाळपूजा आजही करण्यात आली. आषाढी एकादशीला वारीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना शेकडो तास अहोरात्र दर्शन दिल्यानंतर थकवा आलेल्या विठ्युरायाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. विठूरायाला गरम पाणी आणि दह्यादूधानं स्नान घालण्यात आले. यावेळी विठुरायाला अकरा देव ब्राह्मणांच्या साक्षीने रुद्राभिषेक करण्यात आला तसेच 17 वनस्पतींपासून तयार केलेला आयुर्वेदिक काढाही नैवेद्य म्हणून देण्यात आला. यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, प्रक्षाळ पूजेनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी माता मंदिराच्या गर्भगृहास आणि मंदिरास फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.