मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
परभणी जिल्ह्यातील बलसा खुर्द येथे मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळतेय. परभणीतील बलसा खुर्द येथील एकाही मतदारांनी सकाळपासून मतदान केलेलं नाही. मतदार केंद्रावर मतदारच आले नसल्याने मतदान केंद्र ओस पडल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी येथे मतदान सुरू असताना परभणी जिल्ह्यातील बलसा खुर्द येथे मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळतेय. परभणीतील बलसा खुर्द येथील एकाही मतदारांनी सकाळपासून मतदान केलेलं नाही. मतदार केंद्रावर मतदारच आले नसल्याने मतदान केंद्र ओस पडल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून बलसा खुर्द या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. प्रशासनाकडून काही लोकांना पुनर्वसन करून जागा देण्यात आली होती. परंतु काही गावगुंडांकडून त्यांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. याच अतिक्रमणावरून संपूर्ण गावकरी एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. गावातील अतिक्रमण विरोधात प्रशासनाला ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊनही त्याविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी यंदाच्या मतदानावर बहिष्कार घातल्याची माहिती मिळतेय.