लोकलमध्ये कर्कश्श आवाजाच्या जाहिरातींचा तुम्हालाही होतोय त्रास? रेल्वे प्रवाशांची प्रशासनाकडे मागणी काय?
रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी तत्पर असते. मात्र उत्पन्न वाढीसाठी लोकलमध्ये ऐकवल्या जाणाऱ्या जाहीराती रेल्वे प्रशासनाकडून वाजविल्या जात आहेत त्याच आता प्रवाशांची डोके दुखी ठरत आहेत.
मध्य रेल्वे मार्गावरील लोकलमधील मोठ्या आवाजातील जाहिरातींमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. सकाळी-सकाळी लोकलमध्ये लावण्यात येणाऱ्या मोठ्या आवाजातील जाहिराती बंद करण्यात याव्या, अशी मागणी आता मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी करत आहेत. लोकलमधील मोठ्या आवाजातील जाहीराती बंद करा, अशी मागणी प्रवाशांनी रेल्वेकडे केल्यानंतर त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. एकतर सकाळच्या वेळात भरगच्च प्रवाशांनी लोकल ट्रेन भरलेल्या असतात त्यात आजूबाजूच्या गाड्यांचा आवाज असताना आता मोठ्या आवाजातील जाहिरातींची भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मिळालेल्या माहितीनुसार, विविध जाहिराती लोकलमध्ये लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने कंत्राटदाराला पाच वर्षांसाठी कंत्राट दिले आहे. या कंत्राटाद्वारे मध्य रेल्वेच्या १०० हून अधिक लोकलमध्ये जाहिरात लावण्यात येत आहेत. याद्वारे मध्य रेल्वेला पाच वर्षांसाठी १.७ कोटी रुपये देण्यात येतात.