मोदींनी स्वत: फोन करून अमळनेरच्या शिरूडच्या महिला उपसरपंचाचं केले कौतुक, म्हणाले…
शिरूड गावात कल्याणी पाटील यांनी केलेल्या जलसंधारण, सेंद्रिय शेती सह विविध कामांचे नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून कौतुक केले. उपसरपंच कल्याणी पाटील यांच्याशी मोदी यांनी जवळपास आठ मिनिटे संवाद साधला. कल्याणी पाटील यांच्यामुळे शिरूड गावाचे नाव देशभरात रोशन झाले.
जळगाव, २७ फेब्रुवारी २०२४ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश वासीयांशी संवाद साधला. यानिमित्त महाराष्ट्रात पाणी समित्यांच्या माध्यमातून जलसंवर्धानासाठी प्रयत्नशील असलेल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी देखील त्यांनी जवळपास आठ मिनिटे संवाद साधला. ग्रामविकासाला चालना देत असताना शिरूडच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांनी जलसंधारण, मृदसंधारण, सेंद्रिय शेती यावर विशेष भर दिला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत त्यांनी अमळनेर येथे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी गावात विविध उपक्रमांवर विशेष भर देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तसेच जलजीवन मिशन, अटल भूजल, स्वच्छ भारत मिशन या केंद्र सरकारच्या योजनांमध्येही जनजागृती करून लोकसहभाग वाढविला. त्यातूनच शासकीय योजनांना यश मिळत गेले. कल्याणी पाटील यांनी केलेल्या कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून दखल घेण्यात आली आहे.