रतन टाटांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली, ‘दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती’
रतन टाटा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. भारताच्या उद्योगक्षेत्रातील अग्रणी आणि आदराचं नाव काळाच्या पडद्या आड गेलं आहे. देशभरातून राजकीय नेत्यांसह इतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. देशाचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना आदरांजली वाहिली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी 9 आक्टोबर रोजी निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. राजकीय वर्तुळातून अनेक बड्या नेत्यांनी रतना टाटांना आदरांजली वाहली आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘रतन टाटा हे एक दूरदर्शी बिझनेस लीडर, दयाळू आणि विलक्षण व्यक्ती होते. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना त्यांनी स्थिर नेतृत्व त्यांनी प्रदान केले आहे. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते आदर्श ठरले, ‘असे नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.