CM Uddhav Thackeray: लॉकडाऊन देशभर केलात ना, मग भोंगा बंदीही देशभर करा, मुख्यमंत्र्यांनी चेंडू पंतप्रधान मोदींच्या कोर्टात टाकला
CM Uddhav Thackeray: योगी सरकारने भोंगे उतरवले. महाराष्ट्र सरकार ते का करत नाही? असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला गेला.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांचा मुद्दा उचलल्याने त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्र सरकारलाच त्यात आणलं आहे. देशभर लॉकडाऊन केला. नोटाबंदी केली. मग भोंगा बंदीही देशभर करून टाका, असं आवाहनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी भोंगाबंदीचा निर्णय केंद्राच्या कोर्टात टाकून भाजपची चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्र्यांना काय प्रत्युत्तर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्राच्या कोर्टात भोंग्याचा विषय टाकल्याने या मुद्द्यावरून येणाऱ्या काळात राजकारण तापण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.