‘…तर ‘या’ खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही’, पोलीस अधिकाऱ्याच्या वादग्रस्त पोस्टनंतर खळबळ
गणेश मुंडे यांच्या या पोस्टमुळे पोलीस दल आणि राजकारण्यांत एकच खळबळ उडाली आहे. ही पोस्ट केल्यानंतर मुंडे यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. तीन आरोपींपैकी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडे असून या प्रकरणात काही दिवसांपूर्वी बीड खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले होते. बजरंग सोनावणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान गणेश मुंडे यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर यासंदर्भातच वादग्रस्त पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमधील पत्रकारांसाठी पोलीस अधीक्षकांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आहेत. त्यांनी त्यावर पोस्ट करताना म्हटले की, मी पत्रकार परिषद घेतली तर या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, अशा आशयाची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांना खासदाराचे नाव घेतले नाही. त्यानंतर पत्रकारांनी समजनेवाले को इशारा कॉफी होता है, असे म्हणत बजरंग सोनवणे यांच्याकडे रोख असल्याचे पाहायला मिळत आहे.