मराठा आरक्षणाप्रश्नी विनोद पाटील राजकीय पक्षावर संतापले, म्हणाले, ‘…म्हणून सर्वजण स्टेटमेंट देतायत’
VIDEO | 'राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्व राजकीय नेते स्टेटमेंट देतायत', मराठा समन्वयक विनोद पाटील राजकीय पक्षावर संतापले अन् मराठा समाजाला सरसकट कुणबी अर्थात ओबीसीची प्रमाणपत्र द्यावं अशी केली मागणी
छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर २०२३ | मराठवाड्यातील मराठा समाज हा ओबीसी असून निजाम काळातील तशा नोंदी सुद्धा आमच्याकडे आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी अर्थात ओबीसीची प्रमाणपत्र द्यावं हे आमची मागणी रास्त आहे. सरकारने याचा तातडीने विचार करावा, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख, मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे असेही म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधक गेल्या दोन तीन दिवसांपासून आ्ंदोलन स्थळी येऊन भेटी देऊन जात आहे. त्यांनी आम्हाला भेटावं, आमचं सांत्वन जरूर करावं पण हा प्रश्न आपल्या प्रतिनिधीमार्फत सभागृहात हा विषय मांडणं अपेक्षित आहे. सर्व राजकीय पक्ष आलटून पालटून सत्तेत आले पण कोणीही काही केलं नाही. मात्र आज केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्व राजकीय नेते जालन्यातील आंदोलनस्थळी भेट देऊन स्टेटमेंट देत असल्याचे आम्हाला बघायला मिळतंय.