Vasant More : … म्हणून मी आज ‘मनसे’च्या सर्व पदांचा राजीनामा देतोय, वसंत मोरे यांची FB पोस्टद्वारे खदखद व्यक्त
राज ठाकरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का.... मनसे नेते वसंत मोरे यांनी सकाळी मनसेवर नाराजी व्यक्त केली होती आणि आता थेट पक्षाचा राजीनामा दिल्याची फेसबूक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. काय म्हटलंय फेसबूक पोस्टमध्ये...
मुंबई, १२ मार्च २०२४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी सकाळी मनसेवर नाराजी व्यक्त केली होती आणि आता थेट पक्षाचा राजीनामा दिल्याची फेसबूक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. काय म्हटलंय फेसबूक पोस्टमध्ये…
‘प्रति, मा. श्री राजसाहेब ठाकरे,
संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.
धन्यवाद..!
आपला विश्वासू, वसंत (तात्या) मोरे कात्रज पुणे’