16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड अन् लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार, आणखी एका बड्या नेत्याचं वक्तव्य!
काँग्रेसमधील नितीमत्ता संपली आहे. दहापिढ्या बसून खातात इतकं त्यांच्याकडे आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
राजीव गिरी, नांदेडः सध्याच्या सरकारमधले १६ आमदार अपात्र ठरले तर नांदेडकर अन् लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसायला तयार आहेत, असं मोठं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. राज्यात शिंदे-भाजप सरकारचं काम वेगाने सुरु असतानाच अचानक सरकार पडण्या आणि पाडण्याची वक्तव्य सुरु आहेत. मुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात (Supreme court) प्रलंबित आहे. सरकारवर टांगती तलवार तर आहेच. त्यातच अनेक बडे नेते शिंदे गटातील आमदार बरखास्त झाले तर काय होऊ शकतं, याबद्दल शक्यता वर्तवत आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपचा प्लॅन बी सांगितला तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबंडेकर (Prakash Ambedkar) यांनीदेखील मोठं वक्तव्य केलंय.
नांदेडमध्ये सुरु असलेल्या धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. या सभेत त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून मोठी टीका केली. काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर त्यांनी नेमकं बोट ठेवलं. राहुल गांधींचा उपक्रम चांगलाय, मात्र यातून फार काही हाती लागेल, अशी शक्यता कमी असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
नांदेड, धम्म मेळावा.https://t.co/i33R4n8mfO
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 5, 2022
राज्यातील शिंदे सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यापैकी 16 आमदार बरखास्त झाले तर देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी तयार असल्याची चर्चा आहे. हाच धागा पकडत ते म्हणाले, 16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत….
नांदेडचे काँग्रेसमधील बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जाण्याच्या चर्चा अनेकदा येत असतात. यातूनच प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलंय. शिंदे गट अपात्र ठरला तर देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसच्या 22 आमदारांच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले, ‘ काँग्रेस वाले म्हणतायत, आमचं काय शिल्लक राहिलंय? त्यामुळे जे वाचलंय, ते वाचवण्यात ते हित पाहत आहेत, काँग्रेसमधील नितीमत्ता संपली आहे. दहापिढ्या बसून खातात इतकं त्यांच्याकडे आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत, मात्र त्यांच्याकडे मुद्दाच नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. हे सामान्यांचं सरकार नाही. हे लुटारुंचं सरकार आहे, राहुल गांधींनी हे मांडायला शिकलं पाहिजे. हा चालणारा खेळखंडोबा काँग्रेस वाले मांडू शकत नाहीत कारण तेही यात एकेकाळी सहभागी होते. देशात खाजगीकरण काँग्रेसच्या काळात सुरू झालं…
आज इथला कापसाचा शेतकरी डोळे लावून बसलाय की मागच्या सारखा भाव मिळेल.. पण मिळणार नाही. जाणता राजा दवाखान्यात आहे, कापसाला 12 हजारांचा भाव मिळायला हवा, कापूस आयात बंद केलं तर कापूस बारा हजार क्विंटल वर जाईल , शेतकरी संघटना बोलणार नाहीत कारण त्यांनी एकेकाळी गॅट करार त्यानी स्वीकाराला…
शेतकरी जातीला महत्व देतो शेतीला दिला असता तर अशोक चव्हाण निवडून आले नसते, इथला शेतकरी जागृत असता तर जातीच्या उमेदवाराला महत्व दिले नसतं तर उसाला भाव देणाऱ्याला निवडून दिलं असतं, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं..