शरद पवार यांना कोणतं चिन्ह मिळणार? गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ 3 चिन्हांचा प्रस्ताव
राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्हाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हा पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्हाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये वडाचं झाड, कपबशी आणि शिट्टीचा समावेश आहे. या तीन चिन्हापैकी कोणतंही एक चिन्ह निवडणूक आयोग शरद पवार गटाला देऊ शकतं. यापूर्वीच शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार अशा तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यापैकी एक नाव निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानंतर शरद पवारांच्या गटाला ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं नवं नाव देण्यात आलं होतं.