अमित शाह यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात अचानक बदल, सर्व बैठका रद्द अन् दिल्लीकडे रवाना होणार
VIDEO | केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यात अचानक बदल अन् सर्व बैठका रद्द, कार्यक्रमानंतर तातडीने दिल्लीकडे रवाना होणार
पुणे, ६ ऑगस्ट २०२३ | केंद्रीय मंत्री अमित शाह हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यासाठी शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले होते. शनिवार आणि रविवारी या दिवशी अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. दोन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात फक्त सहकार विभागाकडून आयोजित एक कार्यक्रम होता. त्यानंतर त्यांचा इतर सर्व वेळ राखीव ठेवला होता. परंतु आता त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल करण्यात आला आहे. आता अमित शाह कार्यक्रमानंतर तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमित शहा सहकार विभागाचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी ‘ पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा वेळ राखीव होता. कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते. त्याठिकाणी बैठका होणार होत्या. त्या बैठका अमित शह यांनी रद्द केल्या आहेत. आता अमित शहा 3 वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार आहे.