पुणेकरांनो घराबाहेर पडताय? काळजी घ्या, तापमानात होणार मोठी वाढ?
VIDEO | पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात तापमान वाढलं, तापमानाने गाठला नवा उच्चांक, बघा किती आहे तापमान?
पुणे : पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. विदर्भाच्या तापमानाप्रमाणे पुण्यात तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मोका नावाचं चक्रीवादळ तयार झाल्याने कमी दाबाचा पट्ट्याचं रुपातंर चक्रीवादळात झाल्याने त्याचा परिणाम हवामानावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर पुण्यातही तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र उन्हाच्या झळांचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. काल पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. आज सुद्धा तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. यामुळे असह्य करणारा उन्हाचा चटका सध्या पुणेकरांना बसत आहे. सकाळी नऊ वाजेनंतर चटका देणारे ऊन जाणवू लागत आहे. त्यानंतर दुपारी 12 नंतर चटका आणखी वाढत आहे. यामुळे दुपारी रस्तेही ओस पडत आहेत. हवामान विभागाकडून कमाल व किमान तापमानाची आकडेवारी जाहीर झाली. त्यानुसार पुणे शहरात 41 अंश तर कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.