संभाजी भिडेंविरोधात महिला काँग्रेस आक्रमक, पुण्यात भिडे यांच्या फोटोलाच टिकली, पाहा Video
महिला आयोगामार्फतही संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सदर वक्तव्यानंतर भिडे यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, असे नोटीशीत म्हटले आहे.
पुणेः शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान (Shivpratishthan Hindusthan) संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. आधी टिकली लावून ये, मग मी तुझ्याशी बोलतो, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला दिली होती. महिलांच्या (Women Bindi) स्वातंत्र्याविरोधी हे वक्तव्य केल्याने संभाजी भिडे यांच्यावर सोशल मीडियावर तुफ्फान टीका सुरु आहे.
तर राज्यभरातील महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुण्यात संभाजी भिडे यांच्याविरोधात महिला काँग्रेसने आंदोलन केलं. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
त्यांच्या पोस्टरला टिकली लावून महिला कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचा निषेध नोंदवला.
बुधवारी संध्याकाळी संभाजी भिडे हे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर भिडे गुरुजी बाहेर पडले.
यावेळी एका महिल पत्रकाराने त्यांना भेटीत काय झालं, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी आधी तू कुंकू लावून ये, मग मी तुझ्याशी बोलतो, असं वक्तव्य केलं.
प्रत्येक महिला ही भारतमातेचं रुप आहे. भारतमाता विधवा नाही, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय. यावरून महिला वर्गातून संताप व्यक्त होतोय.
आंदोलनाची दृश्य पाहा-
महिला आयोगामार्फतही संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सदर वक्तव्यानंतर भिडे यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, असे नोटीशीत म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडेंविरोधात आज प्रतिक्रिया दिली. भिडे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, असं ते म्हणाले.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही काल यावर प्रतिक्रिया दिली. संभाजी भिडे यांचा आदर आहे, मात्र महिलांनी काय करावं, काय करू नये, हे त्यांनी सांगू नये, असा टोमणा त्यांनी मारला.
संभाजी भिडे यांना महाराष्ट्र सरकारने डोक्यावर बसवू नये, तत्काळ येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करावं, अशी मागणी रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनी केली.