अन्यथा कोल्ह्यांसोबतच्या लांडग्यांचीही महाराष्ट्रात खैर नाही, ‘मनसे’चा इशारा नेमका कुणाला?
मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेचा भव्य सभेने समारोप होणार आहे. 17 मार्च रोजी राहुल गांधींची छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य सभा पार पडणार आहे. परंतु, या सभेआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांना आणि ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे.
मुंबई, १३ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपावेळी इंडिया आघाडीची एक सभा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर होणार आहे. मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेचा भव्य सभेने समारोप होणार आहे. 17 मार्च रोजी राहुल गांधींची छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य सभा पार पडणार आहे. परंतु, या सभेआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांना आणि ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे. ‘राहुल गांधी यांना एक नक्की सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्यासमोर आहे. त्यांचे घरही मैदानाच्या जवळ आहे. तुम्ही महाराष्ट्रात येत आहात. तर तुमचे म्हणणे मांडा, यासाठी आमचा नकार नाही. पण इथे येऊन मागच्यावेळासारखे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कोणतेही अपमानजनक वक्तव्य केले तर महाराष्ट्रातील 14 कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही’, असा इशारा संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यातून दिला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, या कोल्ह्यांसोबत सहभागी असणाऱ्या लांडग्यांनीही हे लक्षात ठेवावे, अन्यथा त्यांची महाराष्ट्रात खैर नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेससोबतच ठाकरे गटालाही इशारा दिला आहे.