Raigad Taliye Landslide | मी बाहेर पडतोय तोपर्यंत घर पडलं, तळीयेतील ग्रामस्थाची आपबिती

Raigad Taliye Landslide | मी बाहेर पडतोय तोपर्यंत घर पडलं, तळीयेतील ग्रामस्थाची आपबिती

| Updated on: Jul 24, 2021 | 1:56 PM

रायगडच्या तळीये (Raygad Taliye Village) गावात डोंगरकडा कोसळून आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंतच्या टुमदार गावाचं रुपांतर स्मशानभूमीत झालं आहे. मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केलाय.

रायगडच्या तळीये (Raygad Taliye Village) गावात डोंगरकडा कोसळून आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंतच्या टुमदार गावाचं रुपांतर स्मशानभूमीत झालं आहे. मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केलाय. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. आपल्या जवळचे नातेवाईक सोडून गेल्याने काय करावं आणि काय नको, असं त्यांना झालंय. आप्तेष्टांच्या आठवणींनी नातेवाईक धायमोकलून रडतायत. दुसरीकडे या घटनेत बचाववेल्या बबन सकपाळ यांनी या घटनेचा थरार टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितला.

अक्रित घडलं…घर पडलं… माणसं गेली…

गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास अक्रित घडलं… जोरदार पाऊस सुरु होता… माणसं आपापल्या घरात होती… त्याचवेळी डोंगरकडा अनेक घरांवर कोसळला. डोंगरकडा खाली येतोय हे दृश्य पाहून काही माणसं बोंबलत बाहेर पळाली. मी आणि माझी तीन मुलं, आम्हीही घराबाहेर पळालो… आम्ही बाहेर पडतोय तोपर्यंत घर पडलं…. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, अशा जड अंतकरणाने घटनेची आपबिती बबन सकपाळ यांनी सांगितली.