Rahul Gandhi यांच्यासमोर रजनी पाटील यांनी मांडली काँग्रेसची कमजोरी, पाहा संपूर्ण भाषण
रजनी पाटील ह्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. राहुल गांधी जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आणि कार्यकर्त्यांच्याही भेटी गाठी घेतायत. त्यातल्या आजच्या एका छोटेखानी सभे दरम्यान रजनी पाटलांनी राहुल गांधींनाच सुनावल्याचं चित्रं निर्माण झालं
काँग्रेससमोरचे संकटं संपताना दिसत नाहीय. कारण कधी काँग्रेसवर भाजपचे नेते टिका करतात तर कधी यूपीए घटकपक्षातले नेते तर कधी खुद्द काँग्रेसचे. शरद पवारांनी काल काँग्रेसच्या नेत्यांना यूपीच्या जमीनदाराची उपमा देऊन सुनावल्यानंतर आज काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी राहुल गांधींना काँग्रेसची सर्वात मोठी त्रुटी सांगितलीय. रजनी पाटील ह्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. राहुल गांधी जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आणि कार्यकर्त्यांच्याही भेटी गाठी घेतायत. त्यातल्या आजच्या एका छोटेखानी सभे दरम्यान रजनी पाटलांनी राहुल गांधींनाच सुनावल्याचं चित्रं निर्माण झालं. रजनी पाटलांनी भाषणाच्या शेवटी सावरासावर केली पण तोपर्यंत बाण भात्यातून सुटून गेला होता.
नेमकं काय म्हणाल्या रजनी पाटील?
गेल्या महिन्याच्या याच तारखेला राहुल गांधी श्रीनगरच्या दौऱ्यावर होते. आज त्याच दोन तारखांना राहुल गांधी जम्मूत आहेत. काँग्रेसच्या ऑफिस पदाधिकाऱ्यांचं संमेलन जम्मूत भरवलं गेलं. त्याला संबोधीत करताना रजनी पाटील म्हणाल्या-राहुलजी मी एकच गोष्ट तुम्हाला बोलू इच्छिते. हे जे समोर बसलेले काँग्रेसचे शिपाई आहेत, त्यांनी खूप मोठी लढाई लढलेली आहे. खुप दु:ख झेलून ते तुमच्यासमोर आलेत. गेल्या दोन वर्षापासून ते संकटाचा सामना करतायत. एक तर प्रशासन त्यांना दाबतंय. केंद्र सरकारशी त्यांची लढाई आहे. आणि दुसरं म्हणजे आपली ना इथं सत्ता आहे ना वर, अशा स्थितीतही संघटनेची रस्त्यावर लढाई लढण्याचं काम ते करतात.
आणि रजनी पाटलांनी सर्वात मोठी त्रुटी सांगितली
भाषणात रजनी पाटील पुढं म्हणाल्या- सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे काँग्रेसचे शिपाई तुमच्यासाठी जीव द्यायलाही तयार आहेत. ती लढाईची ताकद दाखवण्यासाठीच ते इथं आलेत. तुम्ही मला इथं पाठवलत, सोनियाजींनी मला इथं पाठवलं. तर मी एकच गोष्ट आज इथं सांगू इच्छिते-काँग्रेस पार्टीनं खूप जणांना मोठं केलं. आम्ही सगळे इथं पदाधिकारी बसलेले आहोत. मंत्री राहीलेले बसलेत, केंद्रीय मंत्री झालेलेही आहेत इथं. आम्हाला ताकद देण्याचं काम काँग्रेस पार्टीनं केलं. आम्ही ज्यावेळेस म्हणतो की, आम्ही मोठे आहोत तर ती ताकद आम्हाला काँग्रेस पार्टीनं दिलीय. पण हा समोर बसलेले जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांना कुणीच ताकद दिली नाही. त्यांना बळ देण्याची गरज आहे. त्यांना तादक द्यायला तुम्ही आम्हाला सांगता पण ते कुणीच देत नाही, तुम्हीही देत नाहीत. आणि हिच पार्टीची सर्वात मोठी कमजोरी आहे.