संभाजीनगरातील राड्यानंतर मुंबईतील मालवणीत तणावपूर्ण शांतता, 25 जणांना अटक
VIDEO | संभाजीनगरात झालेल्या राड्यानंतर आज मुंबईतदेखील दंगल सदृश्य परिस्थिती, रामनवमीच्या दिवशी मालवणीमध्ये घडलं काय?
मुंबई : छत्रपती संभाजीनगरात बुधवारी रात्री घडलेल्या राड्या नंतर मुंबईतील मालवणी येथे गुरुवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. मुंबईतील मालवणी परिसरातील गेट नंबर पाच परिसरात काल राम नवमीनिमित्तची शोभायात्रा जात होती. या वेळी दोन गटात काही कारणांवरून वाद झाले आणि परस्परांना हाणामारी सुरु झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगण्यासाठी लाठीमारही केला. त्यानंतर येथील तणाव निवळला. मात्र या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, मालवणी येथे दोन गटात आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान हा तणाव निर्माण झाला. दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना येथे लाठीचार्जही करावा लागला. आज शुक्रवारी सकाळी या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे तर आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.