राम शिंदे पुन्हा गरजले, म्हणाले, “रोहित पवार यांचं ते वक्तव्य म्हणजे…”
भाजप आमदार राम शिंदे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांच्यावर गरजले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांना आलेल्या ईडी नोटीसीवरून रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं होतं. यावरून राम शिंदे यांनी रोहित पवार यांना टोला लगावला आहे.
अहमदनगर : भाजप आमदार राम शिंदे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर गरजले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांना आलेल्या ईडी नोटीसीवरून रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं होतं. यावरून राम शिंदे यांनी रोहित पवार यांना टोला लगावला आहे. “रोहित पवार यांनी केलेलं वक्तव्य बालिशपणाचे आहे, त्यांना आणि ठाकरे गटाला कर्नाटकच्या निवडणुकीवर बोलण्याचा अधिकार नाही. कारण त्यांना उमेदवार उभे करता आले नाही”, असं राम शिंदे म्हणाले. राम शिंदे यांनी जयंत पाटील यांना आलेल्या ईडी नोटीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर ही टीका केली आहे. “ज्यावेळी संशात्मक काही गोष्टी आढळून येतात त्याचवेळी ईडीची चौकशी लागली जाते. चुकीचं केलं असेल तर शिक्षा मिळते. जयंत पाटील यांनी काही केलं नसेल तर ते निर्दोष सुटतील. अनेक लोकांना ईडीची चौकशी लागते मात्र अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही.विनाकारण लोकांसमोर तमाशा मांडायचा आणि आम्ही धुतल्या तांदळासारखे आहोत असं दाखवण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न आहे”, अशी टीका राम शिंदे यांनी केली.