आधी मदत जाहीर करा, त्यानंतर दौरा करा, मुख्यमत्र्यांनी मराठवाड्यात पर्यटनाला येऊ नये: राणा जगजितसिंह पाटील
शेतीमालाचे 100 टक्के नुकसान झालंय. मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तात्काळ मदतीची घोषणा करायला हवी, अशी मागणी राणा जगजितसिंह यांनी केलीय.
मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान झालंय. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेल्याचं आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना आधाराची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तात्काळ मदतीची घोषणा करणे अपेक्षा आहे. अशावेळी फक्त गोड गोड बोलून आणि धीर सोडू नका, असं सांगून भागणार नाही. तर त्यांना थेट मदत मिळाली पाहिजे, अशी भूमिका घ्याययला हवी. शेतीमालाचे 100 टक्के नुकसान झालंय. मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तात्काळ मदतीची घोषणा करायला हवी, अशी मागणी राणा जगजितसिंह यांनी केलीय.