Raosaheb Danve | माझं मंत्रिपद जाणार म्हणून काहींना गुदगुल्या, जालन्यात रावसाहेब दानवेंची टोलेबाजी
35 वर्षे मला जालना जिल्ह्यातील मतदारांनी खासदार केलं म्हणून आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झालो. हे झालं नसतं तर आज जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो
जालन्यात रात्री पार पडलेल्या सभेत रावसाहेब दानवे यांनी आपल्या खास शैलीत खुमासदार भाषण केलं. मला जालन्यात राहून कोलकाता, मुंबई दिसते. कारण मी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभा आहे. 35 वर्षे मला जालना जिल्ह्यातील मतदारांनी खासदार केलं म्हणून आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झालो. हे झालं नसतं तर आज जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो, अशी मिश्किल टिप्पणी दानवे यांनी केली. दानवे यांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्येही चांगलाच हशा पिकला.
मतदारांच्या हातात आमच्या पतंगाचा दोरा आहे. आज भागवत कराड यांची मांडव परतनी झाली. पण माझा हनिमून झाला, असंही दानवे यांनी म्हटलं. मात्र, भागवत कराड हे पहिल्या वेळेस मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आल्यानं मांडव परतनी हा शब्द वापरल्याचं दानवे म्हणाले. माझे मंत्रीपद जाणार म्हणून काही जणांना आनंद तर काही जणांना गुदगुल्या झाल्या होत्या, असा टोलाही दानवे यांनी आपल्या विरोधकांना लगावला.