राज ठाकरे रतन टाटांच्या निधनानं भावनिक, FB पोस्ट करत म्हणाले, 'श्रीमंत योगी... एक ज्येष्ठ मित्र गमावला'

राज ठाकरे रतन टाटांच्या निधनानं भावनिक, FB पोस्ट करत म्हणाले, ‘श्रीमंत योगी… एक ज्येष्ठ मित्र गमावला’

| Updated on: Oct 10, 2024 | 11:37 AM

राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच राज ठाकरे यांनी रतन टाटांसोबतचे काही खास फोटोही शेअर केले आहेत. बघा काय म्हटलं पोस्टमध्ये...

रतन टाटा यांच्या निधनानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले, ”आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा ‘कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक’ गमावला, हे त्याहून मोठं दुःख. छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली”, असे राज ठाकरे म्हणाले.

Published on: Oct 10, 2024 11:37 AM