उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला… रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप
रतन टाटा यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांच्या कुलाबा येथील राहत्या निवासस्थानी नेण्यात आलं होतं. तिथे त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी अंत्यदर्शन घेतलं. यानंतर वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा हे अंनतात विलीन झाले आहेत. मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टाटा कुटुंबियांसह उद्योग, राजकारण यांसह विविध क्षेत्रातील काही दिग्गज व्यक्ती वरळी स्मशानभूमी हजर होते. शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांना अखेरचा निरोप आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी व्हीआयपी व्यक्तींसह सर्वसामान्य नागरिकांनी देखील मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. रतन टाटा यांचे निधन बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झाले. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सर्वसामान्य लोकांसह उद्योग क्षेत्र आणि राजकीय वर्तुळातील दिग्गजांकडून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात आली. रतन टाटांच्या निधनमुळे संपूर्ण देश, उद्योग क्षेत्रासह समाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. रतन टाटा यांची रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा प्रकृती खालवली असल्याने त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान रतन टाटा यांची बुधवारी (9 ऑक्टोबर) प्राणज्योत मालवली.