गुंगीचे औषध, निवडणुकीचा ‘संकल्प’; अर्थसंकल्पावर सामनातून टीकास्त्र
काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला गेला. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून या अर्थसंकल्पावर भाष्य करण्यात आलं आहे. पाहा...
काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला गेला. याचं सत्ताधारी पक्षाकडून स्वागत झालं. तर विरोधकांनी त्यावर टीका केली. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून या अर्थसंकल्पावर भाष्य करण्यात आलं आहे. “केवळ 2024 ची लोकसभा आणि यावर्षी काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवूनच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अखेरचा पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर केला . देशात सगळं कसं कुशल मंगल आहे आणि देशातील तमाम वर्गांना सरकार कसे भरभरून देत आहे , असे ‘ आभासी चित्र ‘ अर्थमंत्र्यांनी मांडले . प्राप्तिकराच्या सवलतीचे ‘ गाजर ‘ आणि त्याची ‘ पुंगी ‘ वाजविणारा , मुंबई , महाराष्ट्रावर अन्याय करणारा आणि निवडणूक असलेल्या राज्यांना झुकते माप देणारा हा राजकीय अर्थसंकल्प आहे . सर्वसामान्य जनतेला गुंगीचे औषध देणारा हा निवडणुकीचा ‘ संकल्प ‘ म्हणावा लागेल”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.