शेतकरी उद्ध्वस्त झाला, सरकार भांग ढोसून पडले!; सामनातून शिंदे-फडणवीसांवर शाब्दिक हल्ला
Saamana Editorial : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होळी सेलिब्रेशनवरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टोले लगावण्यात आले आहेत. पाहा...
मुंबई : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून सरकारवर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होळी सेलिब्रेशनवरून टोले लगावण्यात आले आहेत. “देशभरात धुलीवंदन उत्साहात साजरे झाले. महाराष्ट्रात या उत्साहाची भांग सत्ताधाऱयांना जरा अतीच चढली होती. भांग पिऊन नाचण्यासाठी खास दिल्लीहून निमंत्रित बोलावले होते.धुलीवंदनाचा जलसा जुहूच्या पंचतारांकित हॉटेलात सुरू होता. त्याच वेळी महाराष्ट्राचा शेतकरी अवकाळी आणि गारपिटीने उद्ध्वस्त होत होता. हे चित्र विदारक आहे. हेच चित्र विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर मांडले. त्यामुळे तरी धुळवडीच्या ‘गुंगीत’ असलेल्या सरकारने जागे व्हायला हवे. विरोधक शेतकऱयांच्या प्रश्नी शुद्धीत आहे. सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्तेची भांग चढली की राज्यकर्ते असेच बेफाम वागतात. महाराष्ट्रात आज तेच चित्र आहे!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.