‘तो’ एक निर्णय तुमची सत्ता उलथून टाकेन; सामनातून सरकारवर घणाघात
Saamna Editorial : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. खत खरेदीसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. पाहा...
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्यांना आपली जात सांगावी लागणार, असा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला. त्यावर टीका करण्यात आली आहे. “बळीराजा हा अन्नदाता आहे. त्या अन्नदात्याला कसली जात विचारता? ‘शेतकरी’ हीच त्याची जात आणि शेती हाच त्याचा धर्म. आधीच अस्मानी-सुलतानीमुळे त्याला या धर्माचे पालन करणे कठीण झाले आहे. अन्नदात्याचीच अन्नान्न दशा झाली आहे. ती सुधारण्याचे राहिले बाजूला, जात विचारून त्याला हिणविण्याचा कृतघ्नपणा का करीत आहात? खतखरेदीसारख्या अत्यंत साध्या व्यवहारात शेतकऱ्यावर ‘जातसक्ती’ करून कुठल्या पुरोगामित्वाचे ढिंढोरे तुम्ही पिटत आहात? प्रत्येक ठिकाणी जातीला ‘खत’पाणी घालण्याचे उद्योग तुमचे सत्तेचे पीक उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हे विसरू नका”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.