मराठा म्हणजे वाघ आणि सिंह… आरक्षणावरून संभाजी भिडे यांची पलटी
मराठा आरक्षणावरून संभाजी भिडे यांनी युटर्न घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आधी पुढाकाराचं आश्वासन दिलं होतं तर आता आरक्षण कशाला हवं? अशी भूमिका संभाजी भिडे यांनी घेतली आहे. आधी ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली तेव्हा काय म्हणाले होते संभाजी भिडे आता त्यांची भूमिका काय?
मराठा आरक्षणासाठी स्वतः ग्वाही देणाऱ्या संभाजी भिडे यांनी आता मात्र पलटी मारली आहे. उपोषणाच्या वेळी अंतरवाली सराटी येथे जाऊन आरक्षण मिळेल, सत्तेतील एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हा प्रश्न सोडवतील असा विश्वास संभाजी भिडे यांनी व्यक्त केला होता. पण मराठ्यांना देश चालवायचा असल्याने आरक्षणाचं कुठून आणलं.. असं संभाजी भिडे म्हणाले. आरक्षणावरून सुरू असलेल्या उपोषणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला १०० टक्के यश येणार असे म्हटले होते. लवकरात लवकर यश येण्यासाठी या राजकारणी लोकांकडून पाहिजे तसं करून घेण्याची जबाबदारी मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर टाकावी, असे संभाजी भिडे यांनी म्हटले होते. या लढ्याचा शेवट मराठ्यांना आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याचे भिडेंनी म्हटले होते. तर आता मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठून काढलं? असे वक्तव्य करत मराठा आरक्षणावरून संभाजी भिडे यांनी पलटी मारली आहे.