Video:संजय राऊत ठाकरेंसाठी किती महत्त्वाचे? हे दृश्य हजार शब्दांपेक्षा जास्त बोलून गेलं!
जेलमधून बाहेर आल्यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची ही पहिलीच भेट असल्याने या भेटीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
दिनेश दुखंडे, मुंबईः 102 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मातोश्रीवर (Matoshri) दाखल झाले. शिवसैनिकांचा मोठा ताफा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अन् मातोश्रीच्या गेटवर स्वागतासाठी थांबलेले आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)… संजय राऊत यांचा ताफा मातोश्रीच्या आवारात दाखल झाला. शिवसैनिकांच्या गर्दीतून वाट काढत संजय राऊत पुढे गेले अन् आदित्य ठाकरे यांनी त्यांना कडकडून मिठी मारली.
View this post on Instagram
जेलमधून बाहेर आल्यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची ही पहिलीच भेट असल्याने या भेटीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी वडिलकीच्या नात्यातून संजय राऊत यांचा हात आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावर होता. दोघेही गळ्यात गळे घालूनच मातोश्रीकडे निघाले…
मातोश्रीच्या आवारात जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी हे दृश्य पाहिलं. संजय राऊत यांच्यावर आरोप होत असताना ठाकरे कुटुंब त्यांना मदत करणार नाही, त्यांच्या पाठिशी उभे राहणार नाही, असं दबक्या आवाजात बोललं जात होतं. मात्र ठाकरे कुटुंबियांसाठी संजय राऊत किती महत्त्वाचे आहेत, हे या दृश्यावरून स्पष्ट दिसतंय.
मंगळवारी संध्याकाळी संजय राऊत यांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष केला जातोय. काल रात्रीपासूनच ठिकठिकाणी फटाके आणि आतिषबाजी केली जातेय.
मातोश्री आणि संजय राऊत यांच्या घराबाहेर संजय राऊत यांच्या समर्थनार्थ मोठमोठे बॅनर्स झळकवण्यात आले आहेत. पुढची तीन दिवस शिवसेना दिवाळी साजरी करणार असल्याचं सांगण्यात येतंय.