संजय राऊत म्हणताय, आमच्या हृदयावर कोरलेलं बाळासाहेब यांच चित्र अजरामर
राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र उद्घाटन कार्यक्रमावर संजय राऊत यांची टीका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण आज संध्याकाळी 6 वाजता विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने हे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडणार आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र उद्घाटन कार्यक्रमावर टीका केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिथे मराठी माणूस आहे त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले जात आहे. मराठी माणसाला राज्याच्या राजधानीत स्वाभिमानाने, ताठ मानाने जगता यावे, यासाठी बाळासाहेबांनी 55 वर्षे आयुष्याची झीज सोसली. तेव्हा मुंबई मराठी माणसाची राहिली. त्यासाठी मराठी माणूस आजन्म बाळासाहेबांचा ऋणी राहिल. स्मारकं होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचे अनावरण होईल, राजकारण होईल, पण सर्वांच्या हृदयावर बाळासाहेबांचं चित्रं कोरलं ते अजरामर आहे, असा खोचक टोमणाही राऊतांनी लागावला.