हिंदू जन आक्रोश मोर्चा नाही तर ‘भाजप’चीच रॅली, संजय राऊत यांचा खोचक टोला
शिवाजी महाराजांचा अपमान चालतो तेव्हा हिंदू आक्रोश होत नाही, काय म्हणाले संजय राऊत?
मुंबईत सकल हिंदू समाजाने काल जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेच मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. हिंदू जन आक्रोश मोर्चा नाही तर ‘भाजप’चीच रॅली होती, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
कालचा मोर्चा हा कुणाविरोधात होता हे कळलंच नाही. तो भाजपचाच मोर्चा होता. मला वाटतं भाजप महाराष्ट्र युनिट आहे त्यांनी मोदींविरोधात आक्रोश मोर्चा काढला की काय असा लोकांचा गैरसमज आहे. मोर्चाचं नेतृत्व भाजपचे लोकच करत होते. फक्त कपडे बदलले होते. लोक तीच होती. मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली. कारण भाजपने हा मोर्चा मोदींच्या विरोधातच काढला होता, अशी टीकाही त्यांनी केली आहे. केंद्रात तर आठ वर्षापासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. शक्तीमान नेते आहेत. तरीही धर्मांतरे होत असतील. भाजप सांगतं तसं लव्ह जिहादची प्रकरणे होत असतील तर हे सरकारचं अपयश असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.