Saamana : अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून पराभवांचं भाकीत, ‘रोखठोक’मधून नेमकं काय म्हणाले?
सामनाच्या रोखठोक या सदरातून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचं भाकीत वर्तविण्यात आलंय.
अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला. माहिममध्येही अकोल्याची पुनरावृत्ती होईल, असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना डिवचलंय. तर अमित ठाकरेंच्या पराभवासाठी एकनाथ शिंदेंनी कामाख्या देवीला साकडं घातलं असेल, असंही संजय राऊत म्हणाले तर माहिमच्या एका जागेसाठी मनसेची भाजपला इतर ठिकाणी मदत होत असल्याच आरोपही संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केलाय. ‘एकनाथ शिंदेंनी अमित ठाकरेंच्या पराभवासाठी कामाख्या देवीला साकडं घातलं असेल, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आपला काटा काढतील अशी शिंदेंना भिती आहे. त्या भिती पोटीच एकनाथ शिंदे सध्या पछाडलेत. प्रकाश आंबेडकरांचाही अकोल्यात पराभव झाला हे राज ठाकरेंनी विसरू नये, अकोल्याची पुनरावृत्ती दादार-माहिमला होईल, हे स्पष्ट दिसतंय. मोदी शाह हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. महाराष्ट्रात घुसू देऊ नका, अशी राज यांची भूमिका होती. मात्र तेच आता मोदी आणि शहांच्या गरब्यात सामील झालेत. भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठीच राज ठाकरे घराबाहेर पडलेत. माहिमच्या एका जागेसाठी मनसेची भाजपला इतरत्र मदत होतेय’, असं सामनातून राऊतांनी म्हटलंय.