गुजरातसाठी केंद्र सरकारची वाटमारी सुरु, संजय राऊत यांची टीका
महाराष्ट्रातून टेस्ला आणि सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळविण्यात आला असून गेल्या काही वर्षा महाराष्ट्रातून 17 प्रकल्प गुजरातला नेण्यात आले असून ही केंद्र सरकारची वाटमारी असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. नाशिक, पुणे येथे अंमलीपदार्थांच्या व्यापाऱ्यातून महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबई | 31 डिसेंबर 2023 : पंतप्रधान गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वावरत आहेत. आतापर्यंत अन्य कोणत्याही पंतप्रधानांनी असे केलेले नाही. हे सरकार आल्यापासून 17 प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळविण्यात आले आहेत. ही एक एक प्रकारची केंद्र सरकारची वाटमारीच सुरु असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. विषेश म्हणजे या महाराष्ट्राचा रोजगार जात असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुग गिळून गप्प बसले आहेत. याचा मराठीबाणा कुठे गेला असाही सवाल संजय राऊत केला आहे. विदर्भात विशेषत: पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असं खोटं आश्वासन मोदी सरकारने दिले होते अशीही टीका संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रेव्ह पार्टी उद्धवस्त करण्यात आली आहे. यावर विचारले असता हे सरकारचे रेव्ह पार्टीतून निर्माण झाले आहे. नाशिक, पुणे येथे अंमलीपदार्थांच्या व्यापाऱ्यातून महाराष्ट्राचा पंजाब करणे सुरु आहे. हे सर्व ड्रग्ज गुजरात येथून येत आहे. गेल्या काही वर्षात साडे तीन लाख कोटी रुपयाचं ड्रग्ज मुंद्रा बंदरातून पकडल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.