निलेश लंके यांच्या घरवापसीवर संजय राऊत म्हणाले, ते लोकसभा लढणार असतील तर…
अजित पवार गटाचे नेते निलेश लंके हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'निलेश लंके यांच्याशी माझी या विषयावर चर्चा झाली आहे. घर वापसीपेक्षा शरद पवार हे सगळ्यांचे छत्र...'
नाशिक | 14 मार्च 2024 : अजित पवार गटाचे नेते निलेश लंके हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, शरद पवार हे सगळ्यांचे छत्र आहे. निलेश लंके कुठे गेलेच नव्हते. कालच मला समजले मी आणि पवार साहेब व्यासपीठावर होतो. निलेश लंके यांच्याशी माझी या विषयावर चर्चा झाली आहे. घर वापसीपेक्षा शरद पवार हे सगळ्यांचे छत्र आहे. ते पुन्हा इथे येऊन लोकसभा लढणार असतील तर महाराष्ट्र त्यांच्या या भूमिकेचे स्वागत असेलच असे राऊत म्हणाले. यावेळी राऊतांनी भारत जोडो यात्रेवरही प्रतिक्रिया दिली. महविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल आम्ही सगळे एक आहोत. राहुल गांधी यांचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. 17 तारखेला मुंबईतील शिवाजी पार्कला काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होईल. त्यात स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची काल चर्चा झाली. उद्धव ठाकरेंना खास आमंत्रण राहुल गांधी यांनी दिलं आहे. शिवसेना फार मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करत आहे, असं संजय राऊत म्हणाले.