Special Report | संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये!
संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळं राऊतांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये झालीय. आधी अनिल देशमुख नंतर नवाब मलिक आणि त्यानंतर संजय राऊतांच्या रुपात महाविकास आघाडीचे 3-3 नेते आर्थर रोड जेलमध्ये गेलेत.
मुंबई : अखेर पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) आर्थर रोड जेलमध्ये(Arthur Road Jail) गेलेच. ईडीची कोठडी संपल्यानंतर, राऊतांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळं राऊतांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये झालीय. आधी अनिल देशमुख नंतर नवाब मलिक आणि त्यानंतर संजय राऊतांच्या रुपात महाविकास आघाडीचे 3-3 नेते आर्थर रोड जेलमध्ये गेलेत.
22 ऑगस्टपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. या काळात जामिनासाठी प्रयत्न करु असं संजय राऊतांचे भाऊ सुनिल राऊत म्हणालेत. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, तुरुंगात जाण्याआधी भाऊ संदीप राऊतांना संजय राऊतांनी त्यांच्या आईबद्दल विचारपूसही केली.
ज्यावेळी राऊत ईडीच्या कार्यालयात गेले त्यावेळी, ते हात उंचावतच चौकशीला सामोरे गेले आणि आता कोर्टात हजर करण्यावेळीही राऊत हात उंचावतच कोर्टात गेले. मनी लाँड्रिंग प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये गेलेल्यांना त्तात्काळ जामीन मिळालेला नाही. संजय राऊत 8 ऑगस्टला आर्थर रोडजेलमध्ये गेलेत. त्यांना कधी जामीन मिळतो हे कळेल.
मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखही न्यायालयीन कोठडीमुळं आर्थर रोड जेलमध्ये आहेत. 6 नोव्हेंबर 2021ला माजी गृहमंत्री देशमुख आर्थर जेलमध्ये गेलेत. 9 महिन्यांपासून त्यांना जामीन मिळालेला नाही. अनिल देशमुखांनंतर, ईडीनं आपला मोर्चा नवाब मलिकांकडे वळवला. मलिकही सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना जामीन मिळालेला नाही. 7 मार्च 2022ला मलिक आर्थर जेलमध्ये आलेत. 5 महिन्यांपासून मलिक आर्थर रोड जेलमध्येच आहेत
आता राऊतांच्या बाबतीत काय घडतं ? 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी दरम्यानच जामीन मिळतो की मग देशमुख, मलिकांप्रमाणं बराच काळ जेलमध्ये राहावं लागेल, हे सध्या सांगणं कठीण आहे.