‘संभाजी भिडे जर तुमचे गुरूजी असतील तर…’, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
VIDEO | संभाजी भिडे यांच्या 'त्या' वादग्रस्त विधानावरून संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा, काय केली सडकून टीका
मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ | महात्मा फुले, महात्मा गांधी आणि साई बाबा यांचं महाराष्ट्र घडवण्यात योगदान आहे आणि ते श्रद्धा स्थान आहे. त्यांच्यावर कोणी असं विधान करणं विकृती आहे. एखादी व्यक्ती अशा पद्धतीने विधान करत असेल तर सरकारने त्याच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली पाहिजे. ते तुमचे गुरुजी असतील तर तुम्ही त्यांची पूजा करत बसा, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा फुले, महात्मा गांधी आणि साईबाबांविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यभरात संभाजी भिडेंविरोधात आंदोलन सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भिडे यांचा निषेध नोंदवला आहे. तर त्याचे विधानसभेतही पडसाद उमटले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं होतं. तसेच फडणवीस यांनी भिडे यांचा उल्लेख गुरुजी असा केला होता. त्याला विरोधकांनी आक्षेपही घेतला होता.