Sanjay Shirsat : महायुतीच्या प्रचारासाठी कालीचरण महाराजांची सभा? जरांगेवर जहरी टीका; काय म्हणाले संजय शिरसाट?
शिवसेनेचे नेते आणि महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी कालीचरण महाराजांची सभा घेतल्याची चर्चा होते. अशातच संजय शिरसाट यांनीच यावर भाष्य केले आहे.
कालीचरण महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी त्यांनी सभा घेतल्याची चर्चा होते. अशातच संजय शिरसाट यांनीच यावर भाष्य केले आहे. कालीचरण महाराज आणि माझा काही संबंध नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याशीही माझा संबंध नाही. त्यावर मी भाष्यही करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. मनोज जरांगे पाटील हे आजारी होते. त्यांचं आणि माझं नातं वेगळं आहे. मी प्रचारात व्यस्त असल्याने त्यांना भेटू शकलो नाही. म्हणून त्यांची आज भेट घेतली. चहा पाणी घेतलं गप्पा मारल्या. इतर महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली, असे संजय शिरसाट म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटले, माझ्या मतदारसंघात कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर वक्तव्य केलं. त्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली म्हणून काय झालं? कोणी कुठेही सभा घेऊ शकतो त्याला मी कसा पायबंद घालू शकतो? कोणी कुठे सभा घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, असे म्हणत संजय शिरसाटांनी अधिकचं बोलणं टाळल्याचे पाहायला मिळाले. कालीचरण महाराज यांनी माझ्यासाठी सभा घेतली नव्हती. जर घेतली असती तर मी हजर असतो. हा फक्त मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे शिरसाट म्हणाले.