‘राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणंघेणं नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला’, शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल
वरळी विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवणार आहेत. अशातच शिवसेना मुख्यमंत्री शिंदे आदित्य ठाकरेंविरोधात आपला हुकमी एक्का उतरवण्याच्या तयारीत आहे.
महायुतीचं टार्गेट आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना तिकीट मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. वरळी मतदारसंघात ठाकरे गट शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच वरळी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा जय शहा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवावं असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. तर संजय राऊत यांनी केलेल्या खोचक टीकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘वरळी मतदारसंघात दोन नावं आहेत. तिथे कोणाला अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. दोन-तीन इच्छुक आहेत.’, असे संजय शिरसाच म्हणाले. तर संजय राऊतांच्या टीकेवर बोलताना शिरसाट म्हणाले, ‘राऊतांचा आत्मविश्वास मोठा आहे. ठाणे, कल्याणमध्येही त्यांच्या आत्मविश्वास मोठा होता पण तसं झालं नाही. संजय राऊत यांना ठाकरे कुटुंबीयांशी काहीही देणंघेणं नाही. संजय राऊत यांनी ठाकरे कुटुंबाला संपवण्याचा विढा उचलला आहे’, असे म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.