संसदरत्न पुरस्काराची यादी जाहीर, यंदाच्या पुरस्काराचे मानकरी कोण? महाराष्ट्रातील ‘या’ 5 खासदारांचा होणार सन्मान
प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांची यादी संसदेकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा आज पार पडणार आहे.
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२४ : संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांची यादी संसदेकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन खासदार, शिवसेना शिंदे गटातील दोन खासदारांचा समावेश आहे. तर भाजपच्या एका महिला खासदाराला या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राजधानी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा आज पार पडणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भाजपच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार हिना गावित आणि काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना संसद महारत्न पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. संसदरत्न पुरस्कार शिंदे गटाचे कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर झाला आहे.