संतोष हत्येतील आरोपी फरार झाले तरी कसे? सरपंचाची हत्या करून कुठं-कुठं होते मुक्कामी?
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी कुठे लपले होते यासंदर्भात अनेक खुलासे केले जात आहेत. हत्या केल्यानंतर आरोपींचा बीडमधून संभाजीनगर, भिवंडी असा प्रवास राहिला आहे. आरोपींच्या गुजरातच्या गिरनारमध्ये सुद्धा 15 दिवस मुक्काम होता...
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना केली आहे. तर यापूर्वी आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली. तर याप्रकरणी वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोपही केला जात आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी कुठे लपले होते यासंदर्भात अनेक खुलासे केले जात आहेत. हत्या केल्यानंतर आरोपींचा बीडमधून संभाजीनगर, भिवंडी असा प्रवास राहिला आहे. आरोपींच्या गुजरातच्या गिरनारमध्ये सुद्धा 15 दिवस मुक्काम होता अशी ही माहिती आता समोर येत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करून आरोपी बीडच्या वाशी गावातून फरार झाले. पोलीस मागावर असताना आरोपींनी स्वतःच्या गाड्या किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केला नाही. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळेने बीडमधून बाहेर जाण्यासाठी जंगलाचा रस्ता निवडला. तिन्ही आरोपी जवळपास 30 किलोमीटर जंगल आणि शेतीच्या भागातून पायी चालत बीडच्या हद्दीतून बाहेर पडले. बीड हद्दीतून बाहेर पडताच आरोपींनी हायवेवरून खाजगी ट्रॅव्हल्स पकडली. तिन्ही आरोपींनी प्रत्येकी एक हजार असे तीन हजार देऊन छत्रपती संभाजीनगर गाठलं. छत्रपती संभाजीनगरहून तिन्ही आरोपींनी ओला कॅब करून थेट पुण्यातील भोसरी गाठलं. भोसरीतून शेअर कारने आरोपी भिवंडीत सुदर्शन घुलेच्या एका मित्राच्या ठिकाणी पोहोचले. दीड दिवस थांबून आरोपींनी गुजरातच्या दिशेने पळ काढला. गिरनारच्या मंदिरात 15 दिवस मुक्काम केला. पैसे संपल्याने व्यवस्था करण्यासाठी मंदिरातून बाहेर पडलेला कृष्णा आंधळे परत आलाच नाही. शेवटी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यात दाखल झाले आणि बालेवाडी परिसरातून दोन्ही आरोपींना बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.